सलोनी
१९९३ साली पहिल्यांदा इ-मेल शी संबंध आला. त्यापूर्वी आपण कसे जगत होतो इ-मेलशिवाय याचा अचंबा वाटतो इतकी इ-मेल अंगवळणी पडली आहे. रोज सकाळी डोळे उघडायच्या आत संगणक चालु करतो! आणि मला वाटत नाही मी एकटाच आहे असे करणारा!
असो .. तर आज मी अनेक दिवस शोधत असलेली एक कविता कोणीतरी इ-मेलद्वारे पाठवली. कविता आहे कवि भूषण या सतराव्या शतकातील एका उत्तर भारतिय कवीची. शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाप्रित्यर्थ त्याने ही कविता स्तुतिसुमनपर लिहिली आहे.
मला असे वाटते या कवितेमध्ये शिवरायांचे अगदी यथार्थ स्तवन केले आहे. ते असे आहे...
इन्द्र जिमि जम्भ पर, बाडव सुअंब पर
रावण सदम्भ पर रघुकुलराज हैं
(अर्थ - इंद्राने जसा जंभासुराचा पराभव केला. जसा वडवानल समुद्रावर (येऊन आदळतो) जसा रावणाच्या रामाने दंभ उतरावा)
पौन बारिवाह पर, सम्भु रतिनाह पर,
ज्यों सहसबाह पर रामद्विजराज हैं
(अर्थ - जसा वारा ढगांना (पिटाळुन लावातो), शंन्कर जसा मदनावर (तिसरा डोळा उघडतो), जसा सहस्रार्जुनावर परशुराम (तुटुन पडला) )
दावा दृम दण्ड पर, चिता मृगझुंड पर,
भूषण वितुण्ड पर जैसे मृगराज हैं
(अर्थ - वीज जशी वृक्षाच्या बुंध्यावर (कोसळावी), चित्त्याने जशी हरणांच्या कळपावर झेप घ्यावी, आणि सिंहाने जसे हत्तिच्या (गंडस्थळी) विराजमान व्हावे)
तेज तम अन्स पर, कान्हा जिमि कंस पर
त्यों मलेंच्छ बंस पर सेर सिवराज हैं
(अर्थ - तेजाने जसा अंधाराचा (शेवटचा) कण देखील उजळून टाकावा, कृष्णाने जसा कंसावर (विजय मिळवावा
तसा म्लेंच्छाच्या छाताडावर शिवाजी (नामक) सिंह विराजमान आहे)
मी पुन्हा पुन्हा विचार करतो .... शिवाजी महाराज खर्या अर्थाने आपले राष्ट्रपुरुष आहेत. मराठी माणसाच्या रक्तारक्तात त्यांचे तेज भरुन राहिले आहे. त्यांचे जीवन हे आपले प्राण, आपल्या आकांक्षा आणि आपली मार्गदर्शक तत्त्वे बनून राहिली आहेत. आपण शतश: ऋणी असायला हवे की तो आपला वारसा आहे.