Sunday, June 28, 2009

छेडियल्या तारा

प्रिय सलोनी

दोन महिने झाले तुझा जन्म होऊन. त्यानंतरची धावपळ आता कमी होत चालली आहे. परंतु आज थोडा वेळ असा मिळाला आहे की मी नेहेमीप्रमाणे मॉरिसटाऊन ला आलो आहे. त्यामुळे हॉटेलमधुन बसुन हा लेख लिहितो आहे.

मागच्या सहा महिन्यांमध्ये जे काही लिखाण केले ... खरोखरच खुप छान वाटले. पैसे कमावणे आणि पोट भरणे तर रोजच चालु असते. परंतु काव्य शास्त्र विनोद यांनी मनाला आणि आत्म्याला पोषण मिळते.

असो... आज विमानातुन येताना उद्याच्या कामाचे विचार चालु होते. मी सध्या आमच्या कंपनीच्या आयटी विभागाचे परिवर्तन करण्याचे काम करतो आहे. त्याच कामासंदर्भात मंगळवारी लॅरी (आमच्या कंपनीचे मुख्य माहिती तंत्रज्ञान अधिकारी) यांच्या बरोबर आढावाबैठक आहे. मागच्या ८-९ महिन्यांपासुन सुत्रे हाती घेतल्यापासुन मी अनेक गोष्टी करण्याचा प्रयत्न केला आहे. आतापर्यंत यशापयश संमिश्र आहे. कुठेही नेतृत्व करणे म्हणजे विरोधाभास वाटेल अश्या गोष्टींची मोट बांधण्यासारखे असते. एकाचवेळी अनेक गोष्टींचे अवधान ठेवुन विरोधी वाटणारी उद्दिष्टे साध्य करावे लागते. एकावेळी एकाच गोष्टीवर लक्ष केंद्रीत करण्याची चैन नेतृत्व करायचे असेल तर परवडत नाही.

विमानात बसल्या बसल्या माझ्या मनात एक सुंदर गाणे घुमु लागले. तेव्हापासुन अजुन हॉटेलमध्ये येइपर्यंत तेच गाणे गुणगुणतो आहे. सध्याच्या माझ्या कामासंदर्भात माझ्या मनाची अवस्था या गाण्यातुन बर्यापैकी अचूक व्यक्त होते आहे ...

------------

छेडियल्या तारा. ते गीत येईना जुळोनी.
फुलते ना फुल तोच जाय पाकळी गळोनी.
छेडियल्या तारा. छेडियल्या तारा.

आकारुन येत काही. विरते निमिषात तेही.
स्वप्नचित्र पुसुन जाई रंगरंग ओघळोनी.

क्षितिजाच्या पार दूर ... मृगजळास येई पूर
लखलखते अंकुर हे .... येथ चालले गळोनी.
छेडियल्या तारा.

-------------

कवी म्हणतो आहे.... की तारा छेडल्या आहेत परंतु गीत अजूनही जुळुन येत नाही आहे. फुल फुलत आले आहे परंतु तो बहर काही टिकत नाही. कामाचेही असेच आहे.. विशेषत: नेतृत्वाचे. केवळ एक गोष्ट साध्य करुन चालत नाही. अनेक यशांची माळा गुम्फायला लागते. केवळ एक स्वर लावुन चालत नाही. स्वरांचीही माला गुम्फायला लागते. १० पैकी ७-८ गोष्टी साध्य झाल्या तरीही यश मृगजळाप्रमाणे हुलकावण्या देत राह्ते.

आकारुन येत काही. विरते निमिषात तेही.
स्वप्नचित्र विरून जाय. रंगरंग ओघळोनी.

चित्रकाराचे पूर्ण चित्र जसे हळु हळु आकार घेते तसे यश आकार घेते. परंतु चित्र पूर्ण व्हायच्या आधी अनेकदा रंग ओघळतात आणि चित्र धुसर होते. कलाकृतीच्या निर्मितीचा हा खेळ चालु असताना वास्तवीकतेचे भान ठेवणे मात्र अतिशय आवश्यक असते. जर हे भान नाही ठेवले तर आज इथे असलेले हे लखलखते अंकुर कोमेजुन जातील.

क्षितिजाच्या पार दूर मृगजळास येई पूर.
लखलखते अंकुर हे येथ चालले गळोनी.

असो ... पुरे आता. मूळ गाण्याचा अर्थ अजूनही काही असेल. परंतु मी सोयिस्कररीत्या माझ्यापुरता आज असा अर्थ लावला इतकेच काय ते !

1 comment:

Anonymous said...

बरेचदिवसांनी पोस्ट टाकलित.. बरं वाटलं वाचुन..