सध्या भारतामध्ये भ्रष्टाचाराविरुद्ध मोठे आंदोलन चालले आहे. अण्णा हजारे या कुठलेही सरकारी पद किंवा पैश्यांचे बळ मागे नसलेल्या सामान्य माणसाच्या मागे आज या माहिती आणि तंत्रज्ञानाच्या युगात जनता मोठ्या प्रमाणात उभी आहे.
तब्बल २० एक वर्षांपूर्वी आमचे एक युवक शिबिर झाले होते राळेगणसिद्धीला - म्हणजे अण्णांच्या गावी. त्या काळी अण्णांचे नाव त्या गावाचा कायापालट करण्याबद्दल प्रसिद्ध होते. अगदी परदेशातुन आणि इस्राईलमधुन जलतज्ञ येऊन पाहुन जात की नगर जिल्ह्यासारख्या दुष्काळी जिल्ह्यामध्ये हे एकच गाव इतके संपन्न आणि हिरवेगार कसे. अर्थातच त्यामागे अण्णांचे कष्ट होते. सैन्यातुन निवृत्ती घेतल्यानंतर अण्णांनी आपल्या गावी परतुन गांधीजींच्या ग्रामविकासाच्या कल्पनेची कास धरली. दारुबंदी केली. पाण्याचे नियोजन केले, सहकाराच्या माध्यमातुन शाळा, वीज अश्या सोयी आणल्या गावात. राळेगण सिद्धी हे केवळ महाराष्ट्रातच नाही तर देशभर आदर्श गाव म्हणुन प्रसिद्ध झाले.
आमच्या शिबिराचा समारोप करताना अण्णांनी भ्रष्ट्राचार हाच विषय निवडला. आम्ही ५० एक तरुण असु तिथे. अण्णा म्हणाले, "भ्रष्टाचार संपवु म्हणुन संपणार नाही. त्यासाठी आक्रमकता पाहिजे. भाषणांनी साध्य होणार नाही. तुम्हा तरुणांना मी एक उपाय सांगतो. शंभर तरुण गोळा करा. मी तुम्हाला संपुर्ण महाराष्ट्रातील १०० सर्वात जास्त भ्रष्ट जिल्हाधिकारी आणि त्यांची पिल्लावळ यांची यादी देतो. तुम्ही अमुक एक दिवस निवडा. प्रत्येक तरुणाने एक अधिकारी निवडायचा आणि त्या दिवशी त्याची भेट ठरवायची बरोबर दहा वाजता. आणि बरोबर दहाच्या ठोक्याला भेट झाली की काहीही न बोलता त्याला एक ठेऊन द्यायची (भडकावुन द्यायची / श्रीमुखात द्यायची / कानाखाली जाळ काढायचा इत्यादि!)."
अणा पुढे म्हणाले - "कल्पना करा महाराष्ट्रातील सर्व वर्तमान पत्रांमध्ये बातमी येईल की कसे कुणास ठाऊन परंतु काल शंभर तरुणांनी शंभर कार्यालयातील अधिकाऱ्यांच्या कानाखाली वाजवले."
मला त्यावेळी २० एक वर्षांचा असताना ती कल्पना जेवढी आवडली, आज जवळपास ४० च्या आसपास तेवढीच आवडते. आणि अमेरिकेत इथे येऊन तर माझे ठाम मत झाले आहे की राजकिय गोष्टी भीक मागुन मिळत नसतात तर त्यासाठी लढावे लागते, संघर्ष करावा लागतो. याचना करुन फार तर भीक मिळेल. परंतु हक्क आणि सन्मान मिळणार नाही.
पुढे अण्णांनी राज्य सरकारमधील भ्रष्टाचाराविरुद्ध यशस्वी लढा दिला आणि दोन मंत्र्यांना बडतर्फ करायला लावले. परंतु मला वाटते अण्णांनी महाराष्ट्रात माहितीचा अधिकार यावा याचा जो यशस्वी लढा दिला ते आपल्या लोकशाहीच्या इतिहासातील एक सुवर्ण पान आहे. आणि महाराष्ट्राने संपूर्ण भारतामध्ये माहितीच्या अधिकाराची मुहुर्तमेढ रोवली.
आज अण्णांचा लढा हा भारताच्या पातळीवर पोहोचला आहे. लोकपाल विधेयक मांडण्यात यावे या मागणीचा सरकारने अंशत: स्वीकार करुन दोन महिन्यांपूर्वी असे विधेयक आणण्याचे नाटक केले. परंतु अण्णांचे समाधान झाले नाही. प्रत्येक राज्यात लोकायुक्त नेमावा आणि त्याने सर्व भ्रष्टाचाराच्या प्रकरणे सहा महिन्यात निकालात काढावीत अशी मुख्य मागणी आहे. मी त्याचा काहीच अभ्यास केला नाही. परंतु सरकारपेक्षा अण्णांवर माझा शतपटीने जास्त विश्वास आहे.
आळशी, विघ्नसंतोषी, नकारात्मक लोक तसेच भ्रष्टाचारी किंवा हितसंबंधी मंडळी नाके मुरडत आहेत. या विधेयकाने काय होणार असे विचारत आहेत. परंतु पर्यायी उपाय सुचवत नाहीत.
तत्वज्ञान मांडायला खूप सोपे आहे. परंतु कृती अवघड असते. अण्णांच्या उपायात तृटी असणारच आहेत. लोकायुक्तावर अंकुश कोण ठेवणार. आहे त्याच गोष्टी नीट चालवता का नाही येत. न्यायव्यवस्था का नाही सुधारता येत. शंभर सुविचार आहेत. अगदी मलादेखील हे पटते की समांतर रचना निष्फळच ठरेल. जोपर्यंत सामान्य माणुस आपल्या हक्कांसाठी जाब विचारण्याचे धाडस करत नाही तोपर्यंत कुठलीच व्यवस्था नीट काम करत नाही. अगदी लोकायुक्त देखील नाही. लोकायुक्त हा थेट जनतेने निवडुन दिला पाहिजे. तरच ते पद चांगले काम करेल. मग न्यायाधिशांना निवडुन दिले तर? सर्व प्रश्नांचे मुळ ते नाही का? सडलेली न्यायव्यवस्था हे भ्रष्टाचाराचे मुळ कारण आहे. जर न्यायाधीश जनता निवडुन देत असेल तर भ्रष्टाचाराला शासन लवकर होईल आणि भ्रष्टाचार कमी होईल.
परंतु पुन्हा तेच... वाद चर्चा आणि तत्वज्ञान यांचा अतिरेक करुन संधी वाया घालवण्यापेक्षा काहीतरी पदरात पाडुन घेऊन भ्रष्टाचाराविरुद्ध एक पाऊल पुढे उचलणे जास्त महत्वाचे आहे.
अण्णांच्या या लढ्यातुन नुसते भ्रष्टाचाराचे नव्हे तर समाजाच्या औदासिन्याचे निर्मुलन होवो. विष्णुचा दहावा अवतार येऊन आमची सुटका करेल अशी आशा बाळगणारी वृत्ती जाऊन स्वत: धडक देऊन काहीतरी करु अशी उर्मी आणि आत्मविश्वास समाजात येवो. आणि हे मराठ्यांनी नाही करायचे तर कोणी करायचे? ज्ञानेश्वर एकनाथ तुकारामांपासुन ते अगदी छत्रपती शिवाजी, संभाजीराजे, थोरले बाजीराव, माधवराव ते शाहु फुले आंबेडकर टिळक गोखले आगरकर आणि यशवंतराव अशी आपली परंपरा. वस्तुस्थिती ही आहे की केवळ महाराष्ट्रामध्येच हे स्फुल्लिंग आहे आणि ते शिवाजी महाराजांनी पेटवले आहे. तोच आपला वारसा आहे आणि आपणच तो पुढे न्यायचा आहे. अण्णा हे केवळ त्याच परंपरेतील एक धागा आहेत आणि हा लढा त्या परंपरेतील एक रत्न आहे.