३ डिसेम्बर ०८
आज सकाळी सकाळी राजीवचा फ़ोन आला। साधारणतः २ वर्षांपूर्वी राजीवशी ओळख झाली। एक मित्राच्या घरी जेवण आणि गप्पांचा कार्यक्रम होता तिथे राजीव भेटला। राजकारण अर्थव्यवस्था या विषयांवर गप्पा इतक्या रंगल्या की नंतर भेटी होत गेल्या आणि गट्टी जमली । बर्याचदा आम्ही सहकुटुम्ब भेटतो। कधी आमच्या अपार्टमेन्ट मध्ये तर कधी राजीवच्या घरी। अमेरिकेत माणसे तशी दुर्मिळ । त्याहून दुर्मिळ म्हणजे इतर भारतीयांचा सहवास आणि मैत्री। त्यामुळे शुक्रवार/शनीवार/रवीवार या दिवशी सर्वचजण एकमेकांना भेटायला उत्सुक असतात। त्यानिमित्ताने मोठ्यांच्या गप्पा होतात आणि लहान मुलांना मित्र मैत्रीणी मिळतात।
परन्तु आजच्या फोनचा विषय अगदीच गंभीर होता। राजीव एका प्रख्यात विमा कंपनीत आर्थिक सल्लागार म्हणुन काम करतो आहे। कंपनीच्या वरिष्ठांनी त्याला सांगितले की २ आठवड्यांनंतर त्यांने फक्त घरुनच काम करायचे। इतकेच नाही तर त्याचा आरोग्य विमा आणि इतर काही सवलती सर्व काढून घेण्यात येतील। त्यामुले यापुढे राजीवला त्याच्या बायकोच्या (नम्रता) वर थोडेफार अवलंबून रहावे लागणार आहे। नम्रता माझ्याच कंपनी मध्ये काम करीत होती। परन्तु काही महिन्यांपूर्वी आमच्या कंपनीने आपला काही भाग एक दुसऱ्या कंपनीला विकला। त्यामध्ये नम्रताच्या नोकरिचेही हस्तांतर झाले। त्यामुळे पुढच्या काही दिवसांमध्ये नम्रताचीही नोकरी जाऊ शकते।
एकंदरीत हे सर्व अमेरिकेतील सध्याच्या आर्थिक परिस्थितीच्या सामान्य माणसांवर होत असलेल्या परिणामांचे द्योतक आहे। सध्या अमेरिकेत अभूतपूर्व आर्थिक उलथापालथ चालू आहे। अगदी त्यांच्या अर्थव्यवस्थेच्या प्रमुख आधारस्तम्भान्ना धक्का देणारी उलथापालथ आहे ही। मागील २१ वर्षे म्हणजे १९८७ सालापासून अमेरिकेने अत्यन्त उदार वित्तपुरवठ्याचे धोरण स्वीकारले। वित्तपुरवठा म्हणजे अर्थव्यवस्थेतिल विविध घटकांना पोषण पुरवणारा रक्तप्रवाहच जणू। योग्य वित्तपुरवठ्यामुळे समाजातील विविध घटक व्यक्ति आणि संस्था एकमेकांच्या उत्पादन आणि सेवांची सुलभरीत्या आदान प्रदान करू शकतात। जितकी जास्त उत्पादने आणि सेवा तितका अधिक वित्तपुरवठा आवश्यक। परन्तु जरूरीपेक्षा जास्त वित्तपुरवठा चलनफुगवटा निर्माण करू शकतो। अमेरिकेत मात्र याहून अधिक धोकादायक गोष्टी घडल्या। अमेरिकेच्या मुळालाच धक्का लागेल अश्या गोष्टी घडल्या।
परन्तु त्या आधी अमेरिकेच्या आणि एकंदरीतच पाश्चात्य देशांचे यशाचे गमक समजुन घेतले पाहिजे। पाश्चात्य अर्थव्यवस्थांचे अनेक यशोगुण आहेत। संशोधन, नाविन्य, उत्पादकता, न्यायप्रवण प्रशासन, उद्योगाभिमुख धोरण, आणि सर्वात महत्वाचे अतिशय संतुलितरित्या आजमावण्यात येणारी कायदा यंत्रणा।
संतुलित अश्याकरिता की कायद्याने इतकेही कड़क असू नये की समाजातील कल्पकता कोमेजुन जावी। अणि इतके ही शिथीलअसू नये की अराजकता माजेल आणि व्यक्तिगत संपत्तीचे रक्षण करण्याची शाश्वती नसल्यामुळे कल्पकता आकुंचन पावेल। दोन्ही ठिकाणी कल्पकतेचे वर्धन आणि उपयोजन अभिप्रेत आहे। कारण समाजातील राहणीमान कल्पकतेच्या सुयोग्य उपयोजनामुळे वाढत जाते। भारतातून इकडे येउन 8 वर्षे झाली. परन्तु आजही जेव्हा आम्ही परत जातो तेव्हा असे दिसते की ९९ % भारतीयांच्या समस्या त्याच आहेत ज्या ८ वर्षांपुर्वी होत्या। आईटी बीपीओ मुळे सम्पत्ती आल्याचा भास् जरूर आहे परन्तु काही ठरावीक शहरी समाज घटकांपलिकडे राहणीमान कितपत सुधारले आहे? मुद्दा वादाचा जरूर आहे, परन्तु आशय इतकाच की भारतातील न्याय अर्थ आणि प्रशासन यांची घड़ी योग्य नसल्यामुळे आणि जात-पात-प्रांत भेद यांच्या प्राबल्यामुळे कल्पकता अगदी मृतवत झाली आहे। माझ्या मते आपल्याकडील गरिबिचे ते प्रमुखच नव्हे तर एकमेव कारण आहे. याउलट उत्तम न्यायव्यवस्था हे जगातील सर्वच प्रगत देशांचे लक्षण आहे। अगदी आपल्याकडे सुद्धा चाणक्याने सांगितले आहे की "सरकार / शासनाचे उद्दिष्ट समानता नाही तर मास्त्यन्यायाला टाळणे आहे।" विविधता आणि असमानता हा निसर्गाचा गुणधर्म आहे। परन्तु त्या विविधातेचा आणि असमनातेचा गैरफायदा घेउन कोणी समाजातील दुर्बल घटकांवर अन्याय करू नये। समुद्रात भले मोठा मासा लहान माश्याला खात असेल परन्तु मनुष्यत्वाला ते मान्य नाही।
अमेरिकेतील सध्याच्या या आर्थिक उलथापालाथी मागे न्याय आणि प्रशासनातील ढिसाळपणाच कारणीभूत आहे। १९८७ पासून रिपब्लिकन पक्षाच्या सरकारांनी अर्थव्यवस्था, प्रशासन, न्यायव्यवस्था, उद्योगधंधे आणि निगडित कायदे या सर्वान्मधुन शासनाला हद्दपार करण्याचे धोरण स्वीकारले। याचा काही प्रमाणात फायदा जरुर झाला परन्तु त्याचा अतिरेक केला गेल्यामुले तोटाच जास्त झाला असे आता दिसू लागले आहे। यातील सर्वात जास्त दृश्य परिणाम म्हणजे अमेरिकेतील बलाढ्य अर्थसंस्था एकामागोमाग एक ढासळत गेल्या। २००८ साल या दृष्टीने लक्षात ठेवले जाईल की मागील २५ वर्षातील मुक्त अर्थव्यवस्थेच्या नावाखाली सरकारचा अंकुश सर्वच संस्थांमधुन कमी केल्यामुले अर्थव्यवस्था बेलगाम वेगाने धावली आणि गाडी रुळावरुन घसरली।
No comments:
Post a Comment