Saturday, November 12, 2011

दोन घटना - समता आणि बंधुत्व

प्रिय सलोनी,

पुन्हा एकदा विमान प्रवास! पुन्हा एकदा लिखाण.

२ आठवड्यांपूर्वी नोकरी बदलली. आत मी अधिकृतरीत्या सल्लागार झालो. (सल्लागार म्हणजे सल्ला घेणारा गार!) मला वाटते माझ्यासाठी हे चांगले काम आहे. आमचा बोलायचा धंदा. प्रवास खूप जास्त आहे. अगदि दर आठवड्याला म्हणजे खूप जास्त होते. सिद्धु तर लगेच मला मिस करायला लागला. तूसुद्धा सकाळी म्हणालीस, "बाबा तू कामाला जाऊ नकोस." बघु एखादे वर्ष हे करून. हळू हळू अंगवळणी पडेल.

परन्तु एक गोष्ट मला लगेच खटकली ती अशी की माझा लॅपटॉप १४ इंचाचा दिला आहे. त्यावर विमानात काहीही काम करता येत नाही. पूर्वी माझा १२ इंच लॅपटॉप होता तो अगदी चांगला होता.

असो ... तर मागच्या आठवड्यात देखील विमान प्रवास घडला. आता सध्या न्युअर्क बंद. आणि नॅशव्हिल चालू. रविवारी गेलो होतो नॅशव्हिलला. गुरुवारी घरी परत आलो. विमान फिनिक्सपर्यंत पोहोचायला उशिर झाला. मला विमानातील सर्वात शेवटच्या रांगेतील सर्वात शेवटची सीट मिळाली. विमान गेट ला लागले. परंतु आमची स्वारी सर्वात शेवटी उतरणार यात काहीच शंका नव्हती. चिडचिड करुन उपयोग नव्हता. विमानात कधी कधी मला क्लॉस्ट्रोफोबिक व्ह्यायला होते ..नेहेमी नाही .. परंतु त्या दिवशी तसे काहीसे झाले होते.

हळु हळु लोक उतरायला लागले. काही मंडळी नेहेमी प्रवास करणारी .. त्यांच्या गतीने झटपट उतरत होती. परंतु काही "स्लो मोशन" मंडळी अगदी निवांत - आस्ते कदम - गायी म्हशी मंडईतुन जश्या धिम्या गतीने पुढे सरकतात - तशी जात होती. माझ्यापासुन ५ रांगा पुढे एक म्हातारबुवा बसले होते. ८५-९० तरी वय असावे. ते अगदी ९० अन्शात वाकलेले होते. त्यांच्या पुढची रांग रिकामी झाली तसे मला वाटले आता ते आजोबा सगले लोक जाईपर्यंत थांबतील. परन्तु आजोबांना काही थांबायचे नव्हते. ते उठायला लागले. मी मनात म्हटले आता काही खरे नाही.

आजोबांचे वय इतके की ते उठायचा प्रयत्न करत होते परंतु त्यांना उठता येईना. पाय लटपट लट्पट करत होते. अर्धे उठायचे परत खाली बसायचे. असे ५-७ वेला झाले. माझी थोडीशी चिडचिड झाली. परन्तु इतर माणसे गप्प बसुन होती. मागच्या सर्व रांगा शांत्पणे आजोबांची उठायची वाट पहात होत्या. शेवटी एका बाईने आजोबांना दंडाला धरुन उठायला मदत केली.

त्यानंतर ते गृहस्थ हळु हळु दोन रांगांमधुन चालत चालत पुढे गेले. ५ मिनिटे तरी लागली असतील.

मला खरोखरीच कौतुक वाटले सर्व लोकांचे. कोणी चिडचिड दाखवली नाही. भले त्या आजोबांना उठता येत नव्हते, परन्तु त्यांचा जाण्याचा क्रम होता, आणि त्यांची उठण्याची इच्छा होती तर इतर कोणी त्यांना म्हणाले नाही की "थांबा. तुम्हाला वेळ लागेल. आम्हाला आधी जाऊ द्या." इथे अमेरीकेत मला खरोखरीच या गोष्टीचे खूप कौतुक वाटते. खरोखरीची समानता. सर्वांचा आदर. आणि सर्वांचा आत्मसन्मान जपण्याची वृत्ती.

आजोबांना कोणी लगेच मदत केली नाही कारण कधी कधी लोकांना दया आवडत नाही. विशेषत: अमेरिकेत. इथे सामर्थ्याला मान आहे. आणि दया दाखवणे म्हणजे दुर्बळ आहोत असे सूचीत केल्याचे समजतात लोक. म्हणुन त्याना दया आवडत नाही. तसेच कोणी अरेरावी देखील केली नाही. "अहो आजोबा ... कसली घाई आहे... कुठे जायचे... थांबा की..." अश्या कॉमेंट्स आल्या नाहीत कारण अमेरिकन माणसे दुसऱ्याच्या आणि स्वत:च्या दोघांच्या हक्काबद्दल जागरुक आहेत. आदर करतात दुसऱ्याच्या मताचा.

तुझ्या आईनेच दोन आठवड्यांपूर्वी सांगीतलेली गोष्ट: कुठेतरी अमेरीकेत एक बाई तिच्या बाळाला घेउन चालली होति बसमधुन. बाळ खूप जोरात रडत होते. त्यामुळे चिडुन बसचालकाने त्या बाईला सांगीतले की बाळाला शांत कर नाहीतर खाली उतर. तीला बाळाला शांत करणे जमले नाही. त्यामुळे ती खाली उतरली. ते पाहुन बसमधील इता प्रवाश्यांना इतका राग आला की ते सर्वच जण खाली उतरले. पुढे काय झाले ते इतके महत्वाचे नाही. बहुधा त्या बाईला पुन्हा बसमध्ये त्याने घेतले असणार आणि कदाचीत त्याला निलंबीत देखील केले गेले असावे. परंतु महत्वाची गोष्ट ही की सर्व लोकांनी त्या स्त्रीची असहायता ओळखली आणि बसचालकाची अरेरावी चालु दिली नाही.

या दोन्ही गोष्टी अमेरीकन लोकांबद्दल खूप काही चांगले सांगुन जातात. स्वत:चा आणि दुसऱ्याचा सन्मान जपणारे लोक आहेत इथे. दुर्बल असेल तर चालेल परन्तु जिद्द असलेल्या व्यक्तिला मनसोक्त पाठिंबा देणारे लोक आहेत इथे. स्वत:च्या आणि दुसऱ्याच्या स्वातंत्र्याची कदर करणारे लोक आहेत इथे. स्वत:च्या आणि दुसऱ्याच्या हक्कांसाठी उभे राहणारे लोक आहेत इथे.

६० च्या दशकात समान संधी आणि समान प्रवेश या साठी कायदे केले गेले अमेरिकेत. त्यांद्वारे धर्म लिंग वय आनि शारिरीक सबलता यांच्या द्वारे भेदभावला पूर्ण बंदी घातली गेली. त्यामुळे आज अपंग सर्व सार्वजनिक ठिकाणांचा उपभोग घेऊ शकतात. कुठल्याही दुकानात त्यांना जाता येईल अशी सुविधा, बसेस मध्ये त्यांची गाडी चढवता येईल अशी लिफ्ट किंवा रॅम्प , सभागृहांमध्ये वेगळी आसनव्यवस्था ... एक ना दोन. गरोदर बायकादेखील त्यात आल्याच. सिद्धु पोटात असताना मिशिगनमध्ये आम्ही देखील अपंगाचे (आणि गरोदर स्रीयांचे) पार्किंग वापरायचो जेणेकरुन तुझ्या आईला जास्त चालावे लागु नये म्हणुन.

अमेरीकेत खरोखरीच अनेक दोष देखील आहेत. परंतु अमेरीकेवर टीका करताना अमेरीकेचा हा सुंदर मानवी चेहेरा देखील पहावा.

Monday, September 5, 2011

भ्रष्ट्राचारविरोधी आंदोलनाला पाठिंबादर्शक मेळावा - टेम्पी, अ‍ॅरिझोना

सलोनीराणी,

२७ ऑगस्टला इथे फिनिक्समध्ये भ्रष्ट्राचारविरोधी आंदोलनाला पाठिंबादर्शक मेळावा झाला. सुदैवाने मीदेखील त्याच्या आयोजकांपैकी एक होतो. हे आंदोलन कुठे जाईल माहित नाही. परंतु त्यानिमित्ताने भ्रष्टाचाराला सोकावलेले आणि निमुटपणे सहन करणारे दोन्ही वर्ग खडबडुन जागे झाले ... हेही नसे थोडके.

फिनिक्सच्या आमच्या सभेची काही क्षणचित्रे...

अर्थात या मेळाव्याचे यश अण्णांच्या आंदोलनाचे आहे. आम्ही फक्त निमित्तमात्र. दगडाला शेंदुर लावला तर त्यालादेखील लोक नमस्कार करतात तसे.

 अवघ्या तीन दिवसात मेळावा आयोजित केला होता. स्थळ - अ‍ॅरिझोना स्टेट विद्यापीठाच्या ग्रंथालयाचे उद्यान - टेम्पी, अ‍ॅरिझोना. वेळ - सायं ५:३० ते ७:३०, २७ ऑगस्ट, २०११. ११६ अंश तपमान असताना, ३०० लोक या मेळाव्याला सहकुटुम्ब आले.

स्टेज म्हणजे काय तर एक टेबल, त्यामागे झेंडा आणि एक पडदा होता!
लहान मुले चित्रे रंगवण्यात गुंग झाली होती. 
 

एकंदरीतच मेळावा अगदी अनौपचारिक होता त्यामुळे २० एक लोकांनी त्यानंतर आपले कळकळीचे विचार मांडले. माझ्या ११ वर्षांच्या अनुभवात मी अमेरिकेत भारतियांची कुठल्याही विषयावर इतकी एकजुट पाहिली नव्हती आजपर्यंत.

 

२२० लोकांनी पंतप्रधानांना जनलोकपाल विधेयकाला पाठिंबा व्यक्त करणाऱ्या निवेदनावर सह्या केल्या.
आणि सर्वात महत्वाचे माझ्या दृष्टीने ... सलोनीचे "मेरा भारत महान!"

Friday, August 19, 2011

संभवामि युगे युगे

सध्या भारतामध्ये भ्रष्टाचाराविरुद्ध मोठे आंदोलन चालले आहे. अण्णा हजारे या कुठलेही सरकारी पद किंवा पैश्यांचे बळ मागे नसलेल्या सामान्य माणसाच्या मागे आज या माहिती आणि तंत्रज्ञानाच्या युगात जनता मोठ्या प्रमाणात उभी आहे.

तब्बल २० एक वर्षांपूर्वी आमचे एक युवक शिबिर झाले होते राळेगणसिद्धीला - म्हणजे अण्णांच्या गावी. त्या काळी अण्णांचे नाव त्या गावाचा कायापालट करण्याबद्दल प्रसिद्ध होते. अगदी परदेशातुन आणि इस्राईलमधुन जलतज्ञ येऊन पाहुन जात की नगर जिल्ह्यासारख्या दुष्काळी जिल्ह्यामध्ये हे एकच गाव इतके संपन्न आणि हिरवेगार कसे. अर्थातच त्यामागे अण्णांचे कष्ट होते. सैन्यातुन निवृत्ती घेतल्यानंतर अण्णांनी आपल्या गावी परतुन गांधीजींच्या ग्रामविकासाच्या कल्पनेची कास धरली. दारुबंदी केली. पाण्याचे नियोजन केले, सहकाराच्या माध्यमातुन शाळा, वीज अश्या सोयी आणल्या गावात. राळेगण सिद्धी हे केवळ महाराष्ट्रातच नाही तर देशभर आदर्श गाव म्हणुन प्रसिद्ध झाले.

आमच्या शिबिराचा समारोप करताना अण्णांनी भ्रष्ट्राचार हाच विषय निवडला. आम्ही ५० एक तरुण असु तिथे. अण्णा म्हणाले, "भ्रष्टाचार संपवु म्हणुन संपणार नाही. त्यासाठी आक्रमकता पाहिजे. भाषणांनी साध्य होणार नाही. तुम्हा तरुणांना मी एक उपाय सांगतो. शंभर तरुण गोळा करा. मी तुम्हाला संपुर्ण महाराष्ट्रातील १०० सर्वात जास्त भ्रष्ट जिल्हाधिकारी आणि त्यांची पिल्लावळ यांची यादी देतो. तुम्ही अमुक एक दिवस निवडा. प्रत्येक तरुणाने एक अधिकारी निवडायचा आणि त्या दिवशी त्याची भेट ठरवायची बरोबर दहा वाजता. आणि बरोबर दहाच्या ठोक्याला भेट झाली की काहीही न बोलता त्याला एक ठेऊन द्यायची (भडकावुन द्यायची / श्रीमुखात द्यायची / कानाखाली जाळ काढायचा इत्यादि!)."

अणा पुढे म्हणाले - "कल्पना करा महाराष्ट्रातील सर्व वर्तमान पत्रांमध्ये बातमी येईल की कसे कुणास ठाऊन परंतु काल शंभर तरुणांनी शंभर कार्यालयातील अधिकाऱ्यांच्या कानाखाली वाजवले."

मला त्यावेळी २० एक वर्षांचा असताना ती कल्पना जेवढी आवडली, आज जवळपास ४० च्या आसपास तेवढीच आवडते. आणि अमेरिकेत इथे येऊन तर माझे ठाम मत झाले आहे की राजकिय गोष्टी भीक मागुन मिळत नसतात तर त्यासाठी लढावे लागते, संघर्ष करावा लागतो. याचना करुन फार तर भीक मिळेल. परंतु हक्क आणि सन्मान मिळणार नाही.

पुढे अण्णांनी राज्य सरकारमधील भ्रष्टाचाराविरुद्ध यशस्वी लढा दिला आणि दोन मंत्र्यांना बडतर्फ करायला लावले. परंतु मला वाटते अण्णांनी महाराष्ट्रात माहितीचा अधिकार यावा याचा जो यशस्वी लढा दिला ते आपल्या लोकशाहीच्या इतिहासातील एक सुवर्ण पान आहे. आणि महाराष्ट्राने संपूर्ण भारतामध्ये माहितीच्या अधिकाराची मुहुर्तमेढ रोवली.

आज अण्णांचा लढा हा भारताच्या पातळीवर पोहोचला आहे. लोकपाल विधेयक मांडण्यात यावे या मागणीचा सरकारने अंशत: स्वीकार करुन दोन महिन्यांपूर्वी असे विधेयक आणण्याचे नाटक केले. परंतु अण्णांचे समाधान झाले नाही. प्रत्येक राज्यात लोकायुक्त नेमावा आणि त्याने सर्व भ्रष्टाचाराच्या प्रकरणे सहा महिन्यात निकालात काढावीत अशी मुख्य मागणी आहे. मी त्याचा काहीच अभ्यास केला नाही. परंतु सरकारपेक्षा अण्णांवर माझा शतपटीने जास्त विश्वास आहे.

आळशी, विघ्नसंतोषी, नकारात्मक लोक तसेच भ्रष्टाचारी किंवा हितसंबंधी मंडळी नाके मुरडत आहेत. या विधेयकाने काय होणार असे विचारत आहेत. परंतु पर्यायी उपाय सुचवत नाहीत.

तत्वज्ञान मांडायला खूप सोपे आहे. परंतु कृती अवघड असते. अण्णांच्या उपायात तृटी असणारच आहेत. लोकायुक्तावर अंकुश कोण ठेवणार. आहे त्याच गोष्टी नीट चालवता का नाही येत. न्यायव्यवस्था का नाही सुधारता येत. शंभर सुविचार आहेत. अगदी मलादेखील हे पटते की समांतर रचना निष्फळच ठरेल. जोपर्यंत सामान्य माणुस आपल्या हक्कांसाठी जाब विचारण्याचे धाडस करत नाही तोपर्यंत कुठलीच व्यवस्था नीट काम करत नाही. अगदी लोकायुक्त देखील नाही. लोकायुक्त हा थेट जनतेने निवडुन दिला पाहिजे. तरच ते पद चांगले काम करेल. मग न्यायाधिशांना निवडुन दिले तर? सर्व प्रश्नांचे मुळ ते नाही का? सडलेली न्यायव्यवस्था हे भ्रष्टाचाराचे मुळ कारण आहे. जर न्यायाधीश जनता निवडुन देत असेल तर भ्रष्टाचाराला शासन लवकर होईल आणि भ्रष्टाचार कमी होईल.

परंतु पुन्हा तेच... वाद चर्चा आणि तत्वज्ञान यांचा अतिरेक करुन संधी वाया घालवण्यापेक्षा काहीतरी पदरात पाडुन घेऊन भ्रष्टाचाराविरुद्ध एक पाऊल पुढे उचलणे जास्त महत्वाचे आहे.

अण्णांच्या या लढ्यातुन नुसते भ्रष्टाचाराचे नव्हे तर समाजाच्या औदासिन्याचे निर्मुलन होवो. विष्णुचा दहावा अवतार येऊन आमची सुटका करेल अशी आशा बाळगणारी वृत्ती जाऊन स्वत: धडक देऊन काहीतरी करु अशी उर्मी आणि आत्मविश्वास समाजात येवो. आणि हे मराठ्यांनी नाही करायचे तर कोणी करायचे? ज्ञानेश्वर एकनाथ तुकारामांपासुन ते अगदी छत्रपती शिवाजी, संभाजीराजे, थोरले बाजीराव, माधवराव ते शाहु फुले आंबेडकर टिळक गोखले आगरकर आणि यशवंतराव अशी आपली परंपरा. वस्तुस्थिती ही आहे की केवळ महाराष्ट्रामध्येच हे स्फुल्लिंग आहे आणि ते शिवाजी महाराजांनी पेटवले आहे. तोच आपला वारसा आहे आणि आपणच तो पुढे न्यायचा आहे. अण्णा हे केवळ त्याच परंपरेतील एक धागा आहेत आणि हा लढा त्या परंपरेतील एक रत्न आहे.