कोलंबसहून .... (28 May, 2011)
हे अगदी खरे की विमानतळावर जो निवांतपणा मिळतो लिहायला तो वेगळाच! आता कोलंबसहून लिहितो आहे. पहिल्यांदाच इथे येतो आहे. ओहायोची राजधानी! बऱ्याचदा अमेरिकेत राजधान्या म्हणजे अगदी छोटुशी शहरे असतात. उ. मिशिगन ची लान्सिंग, कॅलिफोर्निआची सॅक्रॅमेंटो, न्यु यॉर्क ची अल्बेनी (व्हॉट? कुठे आहे अल्बेनी?). अॅरिझोना तसा अपवाद आणि ओहायो देखील. फिनिक्स आणि कोलम्बस तशी बरीच मोठी शहरे आहेत.
अमेरिकेकडुन शिकण्यासारखे बरेच आहे. कमी महत्वाची गावे राजधान्या असणे हे त्यापैकीच एक! मला वाटते आपल्याकडे राजधानी म्हणजे सम्पूर्ण राज्याचे आर्थिक शोषण करणारी जागा बनते. सगळे भ्रष्ट मंत्री, संत्री आणि त्यांची पिल्लावळ (उद्योगपती, सरकारी अधिकारी इ.) यांच्या सत्तेचा आणि तिच्या दुरूपयोगाचा दर्प तिथे पाऊल ठेवल्या ठेवल्या येतो. दिल्ली मध्ये तर लोक भयंकर उर्मट उद्धट आणि उन्मत्त आहेत. मला वाटते भारताने आपली राजधानी उज्जैन ला हलवावी. दिल्ली एक तर मध्यवर्ती नाही आणि दुसरे म्हणजे तिथल्या प्रस्थापितांना मोठा धक्का देण्याची गरज आहे. तुघलकाने म्हणुनच तर राजधानी हलवली नसेल? आपण त्याला वेडा म्हणतो खरे.. पण खरंच वेडा होता तो?
असो ... परंतु आमची सवारी इथे एका इंटर्व्ह्यु करता आली होती. इंटर्व्ह्यु चांगला झाला. नोकरी मिळेल. परंतु घ्यायची की नाही पाहू. आत्ता तरी मला असे खूप काही "एक्सायटेड" वाटत नाही आहे. एकंदरीतच नोकरीतलाच उत्साह गेला आहे असे म्हणायला हरकत नाही. किंवा इंग्रजीत ज्याला मिड-लाईफ क्रायसिस म्हणतात तो थोडा लवकर आला की काय अशी शंका येते आहे. लहानपणी मला खगोलशास्त्रज्ञ व्हायचे होते. त्यानंतर पायलट ... त्यानंतर प्रत्यक्षात संगणक अभियंता झालो. चार-सहा वर्षे चांगले काम केले. परंतु तिथेही मन रमले नाही. मग व्यवस्थापनाकडे वळलो. तेही आता ८-९ वर्षे करून आता इथेही कंटाळा आला आहे. अर्थात कंटाळा म्हणजे कामाचा नाही तर कामामध्ये एकसुरीपणा आल्याचा आणि आव्हान संपल्याच्या जाणिवेचा. २००० साली एमबीए झाल्यावर ६०,००० डॉलर्सच्या दोन चार नोकऱ्या सोडुन दिल्या आणि बेकार (!) राहिलो काही काळ तेव्हा काही जण म्हणाले पैश्याकडे का बघतोस? तेव्हा मी उत्स्फुर्त पणे दिलेले उत्तर कधीच विसरणार नाही आणि तुदेखील लक्षात ठेव! ६०,००० डॉलर्स ची नोकरी पैश्यासाठी नाही जाऊ दिली. तर त्यात कितपत चांगले काम असणार या विचाराने. पैश्यावरुन कामाची किंमत करु नये हा एक विचार झाला. परंतु कुठल्याही मोठ्या महत्वाच्या कामाला कोण कमी पैसे देईल? त्याऊलट साध्या कामाला कोण जास्त पैसे देईल? ६०,००० हा एक केवळ एक आकडा आहे. ज्याने त्याने ठरवावे आपल्यासाठी किती पगार/पैसे हे आयुष्यातील प्रगतीचा पुढचा टप्पा आहे. परंतु हे नक्की की पैसे हे आपण काय करतो आयुष्यात याचे केवळ एक बाय-प्रॉडक्ट जरी असले तरीही पैश्यावरुन कळते की काय करतो आहोत आणि काय करणार? अपवाद फक्त सृजनशील कामांचा! कोणी चित्र काढतो आणि भुकेला मरतो. कोणी एक मिनिमलिस्ट कलाकार होता... (नाव विसरतो आहे मी... कदाचित अल्बर्टो जॉकेमेटी). त्याने तयार केलेले धातुचे पुतळे अतिशय काडीसारखे असतात. मागच्या वर्षी तसा एक पुतळा १०० मिलिअन डॉलर्सला विकला गेला. परंतु तो शिल्पकार मरुन आता बरीच वर्षे झाली. जिवंत होता तेव्हा त्या पुतळ्यांना कोणी १ लाख सुद्धा दिले नसते. तर सांगण्याचा मुद्दा असा की वस्तुंची किंमत तिथे महत्वाची नाही जिथे सृजनशीलता आहे. कारण सृजन हीच सृजनशीलतेची किंमत किंवा मोबदला असतो. बाकी सर्व ठिकाणी आपण उत्पादन (कॉपी) किंवा अदलाबदल (ट्रेडिंग) करतो. तिथे किंमत ठरते!
असो परंतु काल रात्री शिकागो ते कोलंबस विमानप्रवासाच्या वेळी रात्र असताना टिपुर चांदणे पडले होते. दाट काळोखात तारे पाहताना आपलेच सहस्राक्ष आपल्याकडेच रोखुन बघतात असे वाटते. कॉलेजचे दिवस आठवले. राजगडवरुन ताऱ्यांचे असेच पुंजके दिसायचे. वासोटा ढाक रायगड कोरिगड ..... सगळे आठवले. काही सेकंद का होईना पण निरिच्छ आनंद काय असतो ते अनुभवले आणि भीती वाटली. भीती याची की आता अश्या निरिच्छ आनंदाशी मैत्री करायची ताकत आहे की नाही माहित नाही. आता सगळी धावपळ ही नाव पैसा आणि सुख यांसाठी चालली आहे. मीच नाही तर सर्वच जग ... अमेरिकन भांडवलवाद आणि वस्तुवाद यांसाठी वेडे होत चालले आहे. भारतात दक्षिण भारतात सर्व अय्यंगार ब्राह्मण स्वत:ला शर्मा म्हणवतात. संस्कृत मध्ये शर्म म्हणाजे आनंद. शर्मा म्हणजे आनंद घेणारा. आनंद कश्यात तर ज्ञानाचा ... ब्रह्माच्या/स्वत:च्या शोधाचा! क्षत्रिय स्वत:ला वर्मा म्हणत. कारण ते समाजाचे वर्म म्हणजे शक्तीस्थान होते. परंतु पहा आपल्या संस्कृतीमध्ये ज्ञान श्रेयस आहे आणि पर्यायाने वस्तु गौण आहेत. पुढे कर्मकांड जातिव्यवस्था आली वगैरे सगळे ठिक आहे. काळाच्या ओघात सर्वच चांगल्या कल्पना विकृत होतात. परंतु अगदि काव्यात्मक वाटावे असा जीवनाचा आदर्श भारतियांनी घालण्याचा प्रयत्न केला.
आज आपण भांडवलवाद आणि वस्तुवादाने इतके पछाडलो गेलो आहोत की आपल्याला जीवनाचे उद्दिष्ट काय असावे किंवा समाजाने कश्याचा ध्यास धरावा भौतिक प्रगतिव्यतिरिक्त हे प्रश्न हास्यास्पद वाटतील. परंतु मला वाटते काय सांगावे १०० एक वर्षांनंतर मनुष्य जमात पुन्हा एकदा आपण कसे सोशल अॅनिमल आहोत किंवा "आय थिंक देअरफोर आय अॅम" या दोनपैकी एकाकडे वळेल. आय-आय-टी मधल्या थोडयाफार वास्तव्यात एक मित्र म्हणाला होता ... अमेरिकेने भारताच्या चार पुरुषार्थांचे दोनच करुन टाकले आहेत. अर्थोऽही धर्म: । कामोऽही मोक्ष: ॥ अर्थात ... अर्थ हाच धर्म आणि काम हाच मोक्ष.
आम्ही कॉलेजमध्ये असताना तसे गमतीने म्हणायचो खरे ... परंतु ते अगदी खरे आहे.
परंतु चर्चिल म्हणाला तसे .. "लोकशाही ही अगदी कुचकामी यंत्रणा आहे. परंतु इतर यंत्रणा त्याहुनही जास्त कुचकामी आहेत." ... तसेच भांडवलवादही बऱ्यापैकी दोषबद्ध आहे. परंतु आजच्या घडीला आपल्याकडे तोच सर्वात चांगला पर्याय आहे कदाचित!
हा चर्चिल एक भयानक चावट आणि खवट माणुस होऊन गेला. अमेरिकन लोकांबद्दल तो म्हणाला होता - "अमेरिकन माणुस नेहेमी योग्य तीच गोष्ट करतो ... फक्त त्याआधी तो इतर सर्व (अर्थात चुकीच्या) गोष्टी करुन बघतो"! असो .. सहज आठवले म्हणुन लिहिले.
मागच्या २-४ आठवड्यात इकडे पावसाने मिडवेस्ट मध्ये धुमाकुळ घातला आहे. मिसिसिपी ला इतका पूर आला की लेव्हीज बांधलेल्या फुटल्या काही ठिकाणी. काही ठिकाणी मुद्दामहून बंधारे सोडुन देऊन पूर येऊ द्यावा लागला. त्यानंतर मागच्या चार-पाच दिवसात मिझुरीमध्ये इतके टोर्नेडोज आले की विचारायला नको. ४६ टोर्नेडोज कॅटेगरी ३-४-५ चे. ५ चा टोर्नेडो म्हणजे २०० मैला पेक्षा जास्त वेगाचे वारे असतात. टीव्ही वर दाखवले एक झाड अगदी तासुन निघाले होते... संपुर्ण खोड तासल्यामुळे पांढरे दिसत होते. जॉपलिन नावाच्या गावात अर्धा मैल रुन्द ते चार मैल लांब पट्टयातील घरे भुईसपाट झाली. अगदी घरांचा प्लिंथ / पाया च फक्त शिल्लक राहिला अशी परीस्थिती. या वादळात घरे वाहने.. गुरे ढोरे माणसे मुंग्यांसारखी उडुन जातात. भारतात आपल्याला असा निसर्ग माहितच नाही. त्यातल्यात्यात आंध्रमध्ये.. परंतु एकंदरीत भारतात निसर्ग बराच सौम्य आहे. त्याऊलट अमेरिकेत कुठे वादळ कुठे गारठा कुठे उन्हाळा कुठे भूकंप कुठे पूर असे निसर्गाचे प्रकोप पचवुन इथली माणसे निसर्गावर मात करत जगतात. त्यामुळे जॉपलिनमध्ये इतका विध्वंस होऊनदेखील बव्हंशी लोक हताश दिसत नाहीत. पुन्हा उभारण्याची तयारी आहे. आपल्या कडे किल्लारी भुकंपानंतर लोकांची उभारीच नव्हती. अगदी जपानमध्ये सुद्धा आत्ता सुनामी आली तर लोकांच्या वागण्यात खोल नैराश्य दिसले. परंतु अमेरिकन लोकांमध्ये एक दुर्दम्य आत्मविश्वास, चिकाटी आणि धडपड आहे
असो .... पुरे आता.. संगणकाची बॅटरी मान टाकायला लागली! त्यामुळे इथे थांबतो.