Wednesday, April 6, 2011

पेटंट घेता का पेटंट


सलोनी राणी

कालचा दिवस - तसा दिवस चांगला गेला. परंतु रात्री असे काही तरी घडले की माझी झोप उडाली!

मागचे एक वर्ष बाबा महाराज दोन सॉफ्टवेअर प्रॉडक्ट्स बनवण्यात घालवत आहेत. नोकरीव्यतिरिक्त अर्थात. पैकी एक कच्चे बच्चे का होईना तयार आहे. आणि दुसरे भट्टीत आहे!

चार पाच महिन्यांपूर्वी मी एका गुरुसमान वरिष्ठाजवळ बोलत असताना त्याला मी याबद्दल सांगीतले. त्यावर पहिला प्रश्न त्याने केला की मी पेटंट (स्वामित्व) दाखल केले आहे का? (काहीजण मराठीत स्वामित्वाधिकार म्हणतात. पण मला वाटते तसे म्हणणे म्हणजे पिवळे पीतांबर म्हणण्यासारखे आहे! असो.). तर मला कळलेच नाही यात पेटंट कसले? कोणीही थोडाफार हुशार माणुस असे काही तरी करु शकतो अशी माझी धारणा! कॉलेजमध्ये असताना मी एकदा अर्थशास्त्राच्या वर्गात मास्तरांना म्हणालो होतो की आर्बिट्राज एफिशिअण्ट मार्केट्स मध्ये असूच कसा शकतो. कोणीतरी येऊन ती संधी घेऊन गेलेले असेल. त्यावर ते मला म्हणाले की मी इकॉनॉमिस्ट्ससारखा विचार करतो आहे. रस्त्यावर एक डॉलर बिल पडले आहे. आणि फिजिसिस्ट त्याच्या इकॉनॉमिस्ट मित्राला सांगतो आहे की पैसे आहेत रस्त्यावर. तर हे महाशय म्हणतात शक्यच नाही कारण ते खरे डॉलर बिल असले असते तर एव्हाना कोणीतरी उचलले असते! कोणितरी उचलेल हे खरे आहे .... परंतु ते कोणीतरी आपणही असू शकतो! हो की नाही? तीच गोष्ट पेटंट ची. कोणीही अमुक तमुक प्रॉडक्ट तयार करू शकतो. परंतु आपणही ते "कोणीही" असू शकतो. आणि त्यामुळे पेटंट घ्यायला काय हरकत आहे?

असो ... तर इतके वर्षे डोक्यात घोळत असलेली कल्पना अखेरिस कागदावर लिहिली. त्याचे डिझाईन केले. सप्लायर निवडला. त्याला कॉन्ट्रॅक्ट दिले. आणि मग आमची स्वारी पेटंट फाईल करायल बसली काल रात्री. अंकल सॅम कडे पेटंट चा मोठा खजिना आहे. आणि तुम्ही शोधु शकता की दुसऱ्या कोणी असेच काही केलेले आहे का? तर अहो आश्चर्यम! पहिल्याच फटक्यात एक पेटंट सापडले की जे २००५ मध्ये दाखल केले आणि काल (हो हो अगदी काल) मंजुर केले गेले होते! हे पेटंट साधारण त्याच विषयातले आहे आणि साधारण तेच करते आहे. साम्य इतके आहे की अस्मादिकांची मति चक्रावुन गेली आहे. सुदैवाने आपल्या डिझाईन मध्ये काही अधिक गोष्टी आहेत असे वाटते आहे त्यामुळे आशेचा किरण अगदीच नाही असे नाही. परंतु अप्रत्यक्षरित्या आपल्या कल्पनेमध्ये दम आहे हे पाहुन बरे वाटले. अपले डोके अगदीच कुचकामी नाही तर.

असो .. एकंदरीतच पेटंट - कॉन्ट्रॅक्ट लॉ हे म्हणजे अमेरिकन (आणि पाश्चात्य) यशाचे आणि भरभराटीचे गमक आहे.आणि व्यक्तीस्वातंत्र हा त्याचा पाया आहे.

हजारो वर्षे हाणामाऱ्या करुन या माणसांमध्ये भलतेच व्यक्तीस्वातंत्र्य आले आहे. परंतु अखेरिस अश्या हाणामाऱ्यांपेक्शा वस्तुंवर स्वामित्व-अधिकार (ओइन्क ओइन्क) आणि दोन व्यक्ती अथवा संस्थांमध्ये केलेले कराराचे पालन हे करणे सर्वांच्याच हिताचे आहे हे त्यांना उमगले. या दोन गोष्टी नसतील तर नविन संशोधन, त्याचे उपयोजन होणे कठीण आहे. आणि आपण वर्षानुवर्षे तेच प्रश्न सोडवत बसू. या दोन महत्वाच्या शस्त्रांमुळे मनुष्य जात थोडी कमी हिंस्र झाली आहे.

अगदी आपल्याकडे भारतात सर्वात मागास भाग म्हणजे बिहार अशी आपली आत्ता पर्यंत ची धारणा होती (आणि बव्हंशी आहे). बिहार का मागास? तर तिथे मालमत्ताअधिकार कमी आहेत. जमिनदारांच्या शेतावर १८ तास कष्ट करुन मला काय मिळणार? साधी - सरळ गोष्ट आहे. कश्यासाठी कोण कष्ट करेल?

मला वाटते सर्व जगाने पाश्चात्यांचे ऋणी रहायला हवे असे काही विचार त्यांनी आपल्याला दिले - अखेरीस ( ही माझी पुणेरी टिप्पणी)!

असो .. तर आता माझ्या प्रॉडक्टची चमकार दुसऱ्या प्रॉडक्ट पेक्षा जास्त कशी हे सिद्ध करण्याची तयारी करायला हवी आम्हाला ...